फॅमिली स्टोअर्स
मुंबईला दादर स्टेशनजवळ पश्चिमेला छबिलदास शाळेलगतच्या कोप-यावर आमचं फॅमिली स्टोअर्स हे दुकान उभं असलेलं तुम्हांला दिसेल. दादरला सेंट्रल व वेस्टर्न रेल्वे एकत्र येत असल्यामुळे स्थानिक ग्राहकांप्रमाणेच कल्याण व विरार इथपर्यंतच्या उपनगरातूंन येणा-या मध्यमवर्गीय मराठी ग्राहकांची इथे दिवसभर ये-जा असते. ज्या विश्वासाने व जिव्हाळ्याने ग्राहक इथे येतात, व्यवहाराव्यतिरिक्त चार प्रेमाचे शब्द आमच्याशी बोलतात ते पाहून ग्राह्कांविषयीच्या कृतज्ञतेने मन भरून येते. माझे वडील, आप्पा दुकानातील ही गर्दी पाहून नेहमी म्हणतात असे संतुष्ट ग्राहक हेच आमचं वैभव आहे. व्यवसायातील आता पर्यंतची हीच माझी मिळकत आहे. जी मला पैशांपेक्षा प्रिय आहे.
इ. स.१९४६ साली आमच्या आप्पांनी वयाच्या १८ व्या वर्षी या ठिकाणी व्यवसायाचं छोटंसं रोप लावलं त्याचा आता बहरलेला वृक्ष झाला आहे.
आपल्या मराठी संस्कृतीत व्यापार हा सणांवर अवलंबून असतो, हे ओळखून त्यांनी गणपती मूर्ती, पूजा साहित्य, दिवाळीच्या वेळी फाटके व आता दिवाळीच्या फराळाचे पदार्थ, संक्रांतीला तिळाचे लाडू व हलव्याचे दागिने, जून महिन्यात वह्या, स्टेशनरी अशा हंगामी वस्तू ठेवायला सुरवात केली व त्यातून धंद्याचा जम बसवला. पुढे शहरातील वाढते उद्योगधंदे, शिक्षणाचा प्रसार यांमुळे नोकरीच्या संधी स्त्रियांना देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या. त्या दिवसभर घराबाहेर राहिल्यामुळे तयार पदार्थांच्या मागणीत जोरदार वाढ झाली. मग आप्पांनी गरजू स्त्रियांना हाताशी धरून घरगुती चवीचे तयार पदार्थ विकण्याचा धडाकाच लावला. भाजणीची चकली, बेसन, डिंक, मेथी, पौष्टिक, अळीव, मोतीचूर असे विविध प्रकारचे लाडू, संजो-या, करंज्या, अनारसे, अळूवडी उंडे, मसाले, लोणची अशा पदार्थांची विक्री सतत वाढू लागली.
ग्राहकाला रुचेल असं बोलणं, विनम्र सेवा, सचोटी, कल्पकता, कालानुरूप बदल या गुणांवर आप्पांनी फॅमिली स्टोअर्स या दुकानाला लौकिक मिळवून दिला व मराठी ग्राहकांमध्ये विश्वास संपादन केला.